सर्वप्रथम, 'दीवार' बद्दल पहिली आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खरोखरचं एक उत्कृष्ट चित्रपट आहे. आणि म्हणूनच तो आजही एक उत्तम अभिजात चित्रपट म्हणून गणला जातो. दिवारची कथनाची पद्धत प्रेक्षकाला शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारी आहे, यात काही शंकाच नाही. तो परत परत बघावासा वाटण्यामागचे तेही एक मोठे आणि महत्वाचे कारण आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत लेखकांना प्रथमच प्रसिद्धीचे वलय मिळवून देणाऱ्या सलीम-जावेद यांनी लिहिलेली दीवारची गोष्ट म्हणजे एक 'अचूक जमून आलेली कथाकृती', असा जो सार्वत्रिक समज आहे, त्यात तथ्य हि आहेच. सलीम-जावेद यांच्या पूर्वी चित्रपट लेखन करणारे सामान्यतः दुर्लक्षित असत, त्यांना मानधनही अपुरे मिळे नि त्यांचे अपमानही केले जात.
त्यानंतर येतो तो म्हणजे- सिनेमाचा भाव किंवा भावना- कोणत्याही कलाकृतीच्या यशामागील मूलभूत कारण. एखादी कलाकृती हृदयाला हात घालते, तीही त्यातील रस किंवा भावनांमुळेच. दीवारच्या यशामध्ये सर्वात मोठे योगदान देणाऱ्या घटकांमध्ये याचाही समावेश आहेच. काही अजरामर प्रसंग सोडता, चित्रपट तसा मध्यम दर्जावर राहतो, मात्र त्यातील काही संवाद जनमानसात अगदी 'म्हणी आणि वाक्प्रचारांसारखे' लोकप्रिय झाले आहेत. त्याचवेळी कथेमध्ये भावनात्मकता इतक्या कौशल्याने ओतली आहे की त्यामुळे, 'साम्यवाद' आणि 'नेहरूप्रणीत धर्मनिरपेक्षतावाद' या विखारी तत्त्वज्ञानांच्या द्वयीचे, दीवार हे एक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असे वाहन बनले.
'दीवार'ची तुलना 'कलात्मक' किंवा 'समांतर' चित्रपटांशी केल्यावर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. साम्यवादी विचारसरणी किंवा तिची पिलावळ, रुपेरी पडद्यावरुन खुलेआम पुढे रेटत राहण्याचे नि सतत प्रसिद्ध करत राहण्याचे गोंडस नाव म्हणजे समांतर चित्रपट. दीवार प्रदर्शित होण्याच्या सुमारास, समांतर चित्रपटांची जेमतेम सुरुवात होत होती. या कलात्मक व्यासपीठावरून प्रसिद्ध होणारी प्रत्येक निर्मिती व्यावसायिकदृष्ट्या हमखास अयशस्वी होत असे मात्र तेवढ्याच खात्रीशीरपणे हटकून, पुरस्कारांची मानकरी ठरत असे. एक काळ असा होता, जेव्हा 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेते चित्रपट म्हणजे काहीतरी संदिग्ध आणि वेडगळ स्वरूपाचे चित्रपट, असे समीकरण बनून गेले होते. याचे कारण साधेसरळ होते- त्यात भावनिक आव्हानाचाही अभाव असे आणि सौंदर्यदृष्टीचाही. शिवाय 'कोणालाच कळणार नाही' असे एक ठराविक प्रकारचे कथन त्यात केलेले असे. या सार्वत्रिक कलात्मक उलथापालथीचे वर्णन पूर्ण करायचे तर हे विसरून चालणार नाही, की या चित्रपटांमधील निर्मितीमूल्ये पुष्कळशी झोपडपट्ट्यांशी मिळतीजुळती असत. आपल्याच सातत्यपूर्ण अपयशामुळे वैतागून, या चित्रपट-निर्मात्यांनी मग स्वतःलाच आणि एकमेकांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या स्वतःच्या दोषांमुळे झालेल्या नुकसानाबद्दल, जगावर दोषारोप करण्यासही त्यांनी सुरुवात केली.
दीवारचे तसे नाही. मुख्य कथाकृती तर अतिशयच सरळसोट आहे- एका प्रामाणिक, कष्टाळू आणि कनिष्ठ-मध्यमवर्गीय कुटुंबाला जगण्याची धडपड करताना दुष्ट, दडपशाही करणाऱ्या आणि अन्यायी जगाकडून झालेला त्रास. परंतु त्याला एक रुपेरी किनारही आहे- एक संमिश्र सुखान्त- प्रामाणिकपणा आणि निष्ठा या मूल्यांवरील अविचल श्रद्धा. मात्र, "श्रीमंत लोकांमुळे हे जग दुष्ट, दडपशाही करणारे आणि अन्यायी आहे" या त्यामागील प्रच्छन्न गृहीतकातच खरी गोम आहे. रवीची भूमिका करणारा शशी कपूर चित्रपटात म्हणतो त्याप्रमाणे, "जेव्हा प्रत्येकाला नोकरी असेल, तेव्हा खरी सकाळ झालेली असेल." त्याच्या पित्यानेही पूर्वी, "मजुरांना त्यांच्या घामाच्या थेंबासाठी योग्य मोबदला मिळेल तेव्हा.." असे म्हटलेले आहेच, त्याचाच हा प्रतिध्वनी! हाच तो सरळसरळ साम्यवादी सिद्धान्त.
मुंबईसारख्या भल्याथोरल्या आणि वाईट शहरात बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या, पदरी दोन मुले असणाऱ्या एका निरक्षर पत्नीची आणि असहाय मातेची पिळवणूक करणारी भारतीय व्यवस्था. त्या व्यवस्थेशी तुलना करीत शुद्ध साम्यवादी व्यवस्थेचे गोडवे गाण्यासाठी आणखी चांगला पर्याय कोणता असणार ?
चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच साम्यवादी विचाराचा प्रचार हळूच सुरु होतो. कामगार संघटनेचा झुंजार नेता सत्येन कप्पू, दुष्ट भांडवलशाही वृत्तीच्या खाणमालकाच्या विरोधात जहाल भाषणे देत, कामगारांच्या हक्काच्या वगैरे मागण्या करतो. तेव्हा मागे ठळकपणे दिसत राहते ते 'लाल रंगाचे प्रतिकात्मक आधिक्य'- झेंडे, पताका आणि साम्यवादी फलक, घोषणा वगैरे. अगदी चोख साम्यवादी शैलीत गोष्ट पुढे सरकते तसे, सत्येन कप्पूचे कॉमरेड म्हणजे सहकारी बहुसंख्य खाणकामगार जे निरपराध आहेत, भाबडे आहेत ते- भांडवलशहांच्या डावपेचांना अगदी सहज बळी पडतात. मग येतो कमल कपूर- दुष्ट डोळ्यांचा, निर्दयी खाणमालक. त्याच्या हाताशी असतात त्याचे पित्ते- जे खुनशी गुंड असतात. त्याच्याकडील पेंढा भरलेला बिबट्या तर, त्याच्या क्रौर्याचे चित्र पूर्णच करतो. अर्थातच, त्याला जे करावे लागणारच असते, ते तो करतो- सत्येन कप्पूच्या मुलांचे अपहरण करतो, त्याच्याविरोधात एक खोटेनाटे लाच प्रकरण तयार करतो आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडतो. ते आधी म्हटल्याप्रमाणे भाबडे मजूर स्वतःच सत्येन कप्पूला मारहाण करतात, त्याचा छळ करून त्याच्यावर बहिष्कार घालतात. कामगारांना स्वर्गसुख देऊ शकणाऱ्या त्यांच्या पाठीराख्याचा त्याग समजून घेण्यात ते सर्वसामान्य मर्त्य मानव कमी पडतात. लहान वयातील अमिताभ बच्चनच्या मनगटावर 'मेरा बाप चोर है (माझा बाप चोर आहे)' असे लिहिण्याचा ग्रामस्थांबरोबरचा प्रसंग, एक शक्तिशाली विचार देऊन जातो- "दुष्ट भांडवलशहा हेच खरे चोर आहेत. ते आपले गुन्हे गरिबांच्या नावावर खपवतात, असे गरीब जे सरसकट सगळे प्रामाणिक आणि दुबळे असतात."
साम्यवादी संदेश बळकट करणारा दुसरा एक छोटासा प्रसंग घडतो मुंबईतील डॉकयार्ड म्हणजे गोदीत. यावेळी, शहरी मजुरांना थेट त्यांच्या व्यापारी वृत्तीच्या मालकांकडून नव्हे तर, रस्त्यावरील खंडणीखोरांच्या त्रासाला नेहमी बळी पडावे लागत असते. या खंडणीखोरांना पाठिंबा असतो तो निर्दयी तस्करांचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हिंसक म्होरक्यांचा. जाता जाता आणखी एक- जेव्हा वयोवृद्ध, परोपकारी, दयाळू डोळ्यांचा, कष्टाळू, थकलेला सच्चा मुस्लिम- रहीम चाचा म्हणतो, "मी इथे गेल्या तीस वर्षांपासून काम करतो आहे, आणि खंडणी घेणाऱ्यांच्या नावांखेरीज काहीही बदललेले नाही." तेव्हा तो, अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या तीस वर्षांतील भारताच्या परिस्थितीबद्दल बोलतो. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, 'तीस वर्षांनंतरही साम्यवादी क्रांतीला, अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही'.
मग- एका किशोरवयीन मुलाला एक प्रामाणिक पोलीस अधिकारी (शशी कपूर) गोळी मारतो- असा आणखी एक प्रसंग दाखवला आहे. त्याचा गुन्हा काय? कुटुंबाची भूक भागविण्यासाठी एक डबलरोटी (पाव) चोरण्याचा. त्याच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्याचे वयस्क, थकलेले वडील- ते पालिकेच्या शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक आहेत. यामुळे त्याच्या दुःखसंतप्त आईसाठी पार्श्वभूमी तयार होते. ती शशी कपूरवर ओरडते, "अन्नवस्त्र नसणाऱ्या लोकांवर गोळी झाडण्याइतकाच तुझा न्याय मर्यादित आहे का? जा नि त्या लोकांना पकड, ज्यांनी आपल्या कोठारांमध्ये अन्नधान्याची साठेबाजी केली आहे."
तो काळ दाखविणाऱ्या ठळक गुन्ह्यांपैकी एक म्हणजे साठेबाजी. मद्य किंवा इतर तत्सम वस्तूंचे अवैध उत्पादन व विक्री, बेकायदा जुगार, सोन्याची तस्करी हे इतर काही गुन्हे. हे सगळेच, नेहरूंनी अमलात आणलेल्या आणि पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गुन्हेगारी स्तरापर्यंत नेलेल्या स्टॅलिनच्या धोरणांचे थेट परिणाम होत. जेव्हा तस्करांच्या जगतातील म्होरक्या दावर, त्याच्या मर्जीतील अमिताभ बच्चनला सांगतो, की 'त्याचे सोने दुबईहून येते', तेव्हा ते विधान तत्कालीन भारताबद्दलचे चित्र अप्रत्यक्षपणे उघड करते. दोन दशकांनंतर माफिया डॉन, हिंदूंच्या कत्तली करवून घेणारा मुस्लिम दहशतवादी दाऊद इब्राहिम याला, दुबईत जवळपास सन्माननीय पाहुण्यासारखी वागणूक सरकारकडून मिळते, हा केवळ योगायोग खासच नव्हे!
दीवारमधील चलाखीला आणखी एक पैलू आहे. ज्या टंचाई, बेरोजगारी, शोषण आणि गुन्ह्यांचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत, त्यांच्या मूळ कारणाचा उल्लेख मात्र काळजीपूर्वक आणि कौशल्याने टाळला आहे. हे अगदी थेट समाजवादी धोरण आहे. सरकारवर एकदाही टीका केलेली तुम्हाला आढळणार नाही. उलट, व्यापाराला आणि व्यापाऱ्यांना राक्षसी स्वरूप देण्याच्या सरकारच्या आर्थिक तत्त्वज्ञानाशी हे पूर्णपणे सुसंगत आहे.
तितकीच महत्त्वाची आणखी एक बाब आहे. 'सर्व गरीब लोक आपोआपच सद्गुणी असतात' या दीवारमधील गृहीतकाला दुसरी बाजूही आहे. जर त्यांच्यापैकी काहीजण गुन्हेगार झाले तर त्याचे कारण काय? तर, दंडेली करणाऱ्या श्रीमंतांनी त्यांना बळजबरीने तसे करण्यास भाग पाडलेले असते. विध्वंसक असूयेच्या या किडक्या मनोवृत्तीचे, अमिताभ बच्चन हे एक शक्तिशाली प्रतीक आहे. त्याच्या कृत्यांमधील चुका दाखवून देत त्याला नैतिकतेचे धडे देणारी आई दाखवून, सलीम-जावेद यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. पण, एक प्रेक्षक म्हणून स्वतःला विचारून बघा -: चित्रपटाच्या शेवटी तुमची सहानुभूती कोणाकडे जाते? दीवारचा नायक म्हणून निर्विवादपणे कोण समोर येतो? अमिताभ बच्चन विमनस्क आणि पराभूतांचे प्रतीक असूनही, आजही 'प्रस्थापितांच्या विरोधातील नायक' म्हणून का गणला जातो?
आणखी एक गोष्ट म्हणजे, दीवारमधील खलनायकांची नावे आणि त्यांच्या पार्श्वभूमीही पुरेश्या बोलक्या आहेत. त्यापैकी जवळपास सगळेच, हिंदू व्यापारी / व्यावसायिक आहेत- सामंत, दावर, जयचंद,.. दीवारच्या अतुलनीय यशामुळे पुढेही हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदू व्यावसायिकांची तशीच साचेबद्ध प्रतिमा कायम बनत गेली... त्यांची नावेही तशीच- लाला, सेठ, मुन्शीजी वगैरे. भांडवलशाही मनोवृत्तीने गरिबांचे निर्दयी शोषण करणाऱ्या सर्वांशी ही नावे जोडलीच गेली.
इतकेच नाही तर, चांगुलपणा, भलाई, सच्चाई आणि सद्गुण यांचे प्रतीक कोण- तर रहीम चाचा, तसे दिसेलच आपल्याला.
खरे पाहता, दीवार हे एक बंड होते आणि ते तसेच राहील. हिंदी चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात अतिशय सूक्ष्म, तरल परंतु तरीही आकर्षक, मोहक पद्धतीने साम्यवादाचा प्रचार प्रसार करण्याच्या बाबतीत 'दीवार'ला भव्य दिव्य यश प्राप्त झाले आहे. आणि हो! हे यश असे आहे, की ज्याचा लेनिनला अभिमान वाटला असता.
पुढे चालू
The Dharma Dispatch is now available on Telegram! For original and insightful narratives on Indian Culture and History, subscribe to us on Telegram.